दैनंदिन कार्यक्रम

श्री महालक्ष्मी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम ‌:

पहाटे ४.३० वा

करवीरच्या प्राचीन महालक्ष्मी मंदिरात वेगवेगळ्या विधी कार्यक्रमात आरती कार्यक्रमाला अधिक महत्व आहे.प्रतिदिनी पहाटे ४ ३० वाजता मंदिर उघडल्यावर पाद्यपूजा होऊन आरती केली जाते.या आरतीला काकड आरती असेही म्हणतात.या आरतीच्या वेळी वेगवेगळ्या भूपाळ्या म्हटल्या जातात.तर काही भूप रागातील गाणी गायिली जातात.

स ८.३० वा

सकाळी ८.३० वाजता देवीच्या नित्य कार्यक्रमातील महापूजा विधी असते.या विधीनंतर आरती होते.मंगल आरती होते.

स ११.३० वा

स ११.३० वाजता भक्तगणांसाठी पाद्यपूजा, महापूजा, कुंकुमार्जन आदी विधी केले जातात.यावेळीच देवीचा महानैवेद्य होतो.त्यावेळी कापूर आरती, धुपारती केली जाते.जर भक्तांकडून महापूजा वगैरे विधी नसेल तर दुसऱ्या वेळी मूर्तीवर पंचामृत स्नान न घालता पायावर दूध घालून आरती होते.साधारण दुपारी २ वाजेपर्यंत हा विधी चालतो. त्यानंतर अलंकार पूजा बांधतात.मंदिराच्या गाभाऱ्यात वेद म्हटले जातात.

सायं ७.३० वा

सायंकाळी ७.३० नंतर घंटानिनाद होऊन देवीची आरती होते. त्याला ‘भोग आरती’ असेही संबोधतात.दर शुक्रवारी रात्री महानैवेद्य असतो.या आरतीनंतर देवीची अलंकार पूजा उतरली जाते.अलंकार खजिन्यात पूर्ण स्वीकारल्यानंतर रात्री १० वाजता शेजारती होते.यावेळी देवीला दुग्धशर्करा नैवेद्य दाखविला जातो आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील शेजगृहात देवीची आरती होते.यावेळी निद्राविड्यानंतर मंदिराचे प्रमुख व उपद्वार बंद होऊन दैनंदिन कार्यक्रमाची सांगता होते.
अशाप्रकारे मंदिरात प्रतिदिनी ५ वेळा आरती होते.सकाळी ९.३० व दुपारी १२.३० आणि रात्री ८ १५ या आरतीनंतर महाकाली, मातृलिंग, श्रीयंत्र, महागणपती, महासरस्वती यांनाही आरती व नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.तर प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी या आरतीस्थानात वाढ होऊन मंदिर परिसरातील मंदिराच्या आवारातील छोट्या-मोठ्या ८७ मंदिरांना आरती भेट देते.प्रतिदिनी या पाच आरत्यांपैकी काकड आरती, शेजारती पर्यंत विविध आरत्यांनी सातत्याने हजर राहणारे वेगवेगळे भक्तसमूह आहेत.त्यांचे प्रमाण सरासरी १८३ दैनंदिन प्रतिआरती असते.या आरत्यांसाठी एकारती, पंचारती, कापुरारती अशा तीन वेगवेगळ्या आरत्या वापरल्या जातात.देवीच्या या तिन्ही आरत्यांपैकी २ आरत्या चांदीच्या असून कापुरारती पितळेची आहे.
मंदिरातील या दैनंदिन आरत्यांशिवाय त्र्यंबोली यात्रा, रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण कालावधी, गोकुळाष्टमी, किरणोत्सव आदी सणांच्या वेळी जादा आरती होते.याखेरीज ज्यावेळी श्रीमद् जगदगुरू शंकराचार्य करवीर पीठ व श्रीमान छत्रपती यांची मंदिरात भेट झाल्यानंतर विशेष आरती करण्याची पारंपारिक प्रथा आहे.
कार्तिक महिन्यात दीपावली, नरक चतुर्दशी ते कार्तिक पोर्णिमा या १६ दिवसांत देवीचा कार्तिक उत्सव असतो या दिवसांत ५ ही आरत्या करण्याची प्रथा असून या ५ आरत्यांसाठी या कालावधीत हजारो स्त्री-पुरूष भाग घेतात तो सोहळा बघण्यासारखा असतो.

Powered By Indic IME