About Annachhatra

Raju-mevekari

Raju-mevekari

संपूर्ण भारतभर श्रीदेवीचे ५१ शक्तिपीठे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत. या पीठांमध्ये कोल्हापूर, तुळजापूर, माहूर-वणी या पीठांचा समावेश असून त्यामध्ये माहूर-वणी हे पूर्ण शक्तीपीठ आहे.

श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी रणरागीणी ताराराणी यांनी करवीर संस्थानाची स्थापना केली. लोकराजा राजर्षि शाहू छत्रपती महाराज यांच्या ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या संकल्पनेतून निर्माण झालेली ही नगरी म्हणूनच देवीचे मातृपीठ असून या नगरीस कलानगरी असे संबोधतात.

श्री महालक्ष्मी (अंबाबाई) दर्शनासाठी हिंदूस्थानच्या काना-कोपर्‍यातून लाखो भक्त दरवर्षी कोल्हापूर नगरीस भेट देत असतात. मनोभावे यथासांग देवीचे दर्शन घेऊन जात असतात. परंतु आमच्यामनामध्ये एक खंत सलत होती. ती म्हणजे अन्नछत्राची. हिंदुस्थानातील विविध तीर्थक्षेत्रे व धार्मिक ठिकाणी अन्नदानाची परंपरा आहे. ‘अन्नदान हेच पुण्यदान’ या श्रध्देतून शेगांव, शिर्डी, अक्कलकोट, तसेच इतर बर्‍याच मंदिरांच्या ठिकाणी अन्नदान केले जाते. पण आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये अशा प्रकारची व्यवस्था नव्हती. म्हणून आम्ही समविचारी कार्यकर्ते एकत्र येऊन जानेवारी २००८ शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रथम प्रत्येक पौर्णिमेदिवशी अन्नदान करावेे असे नियोजन केले. दोन वर्षानंतर हा उपक्रम यशस्वी झालेनंतर जानेवारी २०१० साली पौर्णिमेबरोबरच प्रत्येक शुक्रवारी हा अन्नदानाचा उपक्रम सुरु केला. नंतर भक्तांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जानेवारी २०११ सालापासून प्रत्येक पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार, शनिवार व रविवार असे आठवड्यातील चार दिवस हे अन्नछत्र सुरू केले. नंतर भक्तांचा वाढता प्रतिसाद व दुरवर झालेली चांगली ओळख, ह्याबळावर हे अन्नछत्र मोठ्या स्वरुपात व दररोज करावे असे नियोजन सुरु केले. महालक्ष्मी अंबाबाईचा आशिर्वाद व स्थानिक व परस्थ भक्तांच्या सहकार्यामुळे आंम्हास या अन्नछत्राची व्याप्ती वाढविणेसाठी खूप मदत झाली.

कपिलतीर्थ मार्केट येथील दुसर्‍या मजल्यावरील एक हॉल बरेच वर्ष बंद अवस्थेत आहे हे समजल्यावर या हॉलचा अन्नछत्रासाठी उपयोग होईल असे आम्हांस वाटले. म्हणून आम्ही कोल्हापूर महानगर पालिकेकडे अर्ज करुन याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी आमचे पवित्र कार्य पाहून व आमची धडपड पाहून सर्वांनी महासभेमध्ये एकमुखी ठराव करुन हा हॉल नाममात्र भाड्यामध्ये श्री महालक्ष्मी अन्नछत्रासाठी उपलब्ध करुन द्यावा असा ठराव केला. यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी बहूमोल सहकार्य करुन हा हॉल आम्हांस उपलब्ध करुन दिला.

सदर हॉलचे चांगल्या प्रकारचे अद्ययावत सुशोभिकरण करुन दररोज उत्तम दर्जाचा प्रसाद त्याचबरोबर स्वच्छता, टापटीपपणा या गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन अन्नछत्र कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेमध्ये एक मानाचे स्थान निर्माण केले आहे. प्रार्थना !

श्री. राजू अ. मेवेकरी-जाधव

संस्थापक – अध्यक्ष

Powered By Indic IME